अकोला : कुत्र्यांपासून माणसांना जीवघेणा रेबीज आजार होतो. जगभरात दरवर्षी ५९ हजारपेक्षा जास्त लोकांचा रेबीज या आजारामुळे मृत्यू झाला आहे. देशातही गत दोन वर्षांमध्ये रेबीजमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी तब्बल ३६ टक्के मृत्यू देशात झाले आहे. २२ हजारांहून अधिक नागरिकांचा रेबीज या आजारामुळे मृत्यू झाला आहे.
आशिया आणि अफ्रिका देशांमध्ये रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी श्वानांमधील अॅन्टी रेबीज लसीकरण प्रभावीरीत्या मोहिम स्वरुपात राबविणे गरजेचे आहे. भारतात ९५ टक्के प्रकरणात कुत्र्यांमुळे, दोन टक्के प्रकरणात मांजर आणि एक टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगूसामुळे रेबीज आजार पसरतो. रेबीजमुळे जगातून सार्वाधिक मृत्यू हे देशात होतात. त्यामुळे कुत्रा पाळणा-या कुटुंबांनी श्वानांमधील अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. रेबीज पशुसंक्रमित मानवी आजार असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे.
रेबीज आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी श्वानांमधील एन्टी रेबीज लसीकरण प्रभावीरीत्या मोहिम स्वरुपात राबविणे गरजेचे आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कुत्र्यांचे श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.- डॉ .जगदीश बुकतारे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन, अकोला.