अकोट /अकोला : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत मालपुरा येथे शेतीच्या वादावरून चार जणांची क्रुरपणे हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यामुळे अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी तीन आरोपींना १७ मे रोजी फाशीची शिक्षा सुनावली.
फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या आरोपींमध्ये हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५), द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे (५०), श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) सर्व रा. राहुल नगर अकोट यांचा समावेश आहे. यामध्ये भादंवि ३०२ सह कलम ३४ अंतर्गत शिक्षा पात्र गुन्ह्याकरिता तिन्ही आरोपींना मृत्यूदंडाची म्हणजे मरेपर्यत फाशीची शिक्षा व प्रत्येकी रुपये ५० हजार रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
आरोपींनी द्रव्यदंड न भरल्यास आरोपींना ५ वर्षं अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. भादंविच्या ५०६ (भाग २) सह ३४ या कलमा अंतर्गत आरोपींना प्रत्येकी ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची व प्रत्येकी १० हजार रुपये अशा द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींनी दंड न भरल्यास १ वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. शेतीच्या हिस्स्याच्या वादातून हे हत्याकांड घडले होते. याप्रकरणी पोलिस निरीक्षक भाष्कर तंवर तपास केला व हेमंत चौधरी यांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी बाजू मांडली.