अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील रहिवासी असलेल्या श्वेता विनोद सिरसाट हिला गर्भवती असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसूती होताच प्रकृती गंभीर असल्याचे कारण सांगून आयकॉन हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणी चार ते पाच दिवसांचा उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी हलगर्जी केल्याने तसेच चुकीच्या उपचारामुळे श्वेता सिरसाट यांचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील विलास दामोदर यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात केली आहे.श्वेता विनोद सिरसाट हिला प्रसूतीकळा आल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान डॉक्टरांनी सिझेरियन प्रसूती केली. यादम्यान अति रक्तस्राव होत असल्यामुळे महिला व शिशूस तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे श्वेताचे वडील व पती यांनी तिला आयकॉन रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. १२ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत तिला याच रुग्णालयात ठेवल्यामुळे तिची प्रकृती ठीक झाल्याने नातेवाइकांनी सुटीची मागणी केली; मात्र प्रकृती ठणठणीत होण्यास आणखी ३ ते ४ दिवस रुग्णास भरती ठेवावे लागणार असल्याचे आयकॉनचे डॉ. अडगावकर यांनी सांगितले; मात्र त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी मुलगी श्वेता सिरसाट यांचा मत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे नातेवाइकांना धक्का बसला. मुलीच्या मृत्यूस आयकॉन येथील डॉक्टरांचा चुकीचा उपचार व हलगर्जीपणा जबाबदार असल्याची तक्रार डाबकी रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाची जिल्हा आरोग्य समितीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही तक्रार मृतक श्वेताचे वडील विलास दामोदर यांनी डाबकी रोड पोलिसांकडे केली आहे.