बोरगाव मंजू (जि. अकोला): अकोला ते मुर्तीजापूर दरम्यान राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाचा भाग म्हणून बोरगाव मंजू गावाजवळ बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, ३० जून रोजी उघडकीस आली. बाळू मोहन इंगळे (३५ए रा. रामजी नगर बोरगाव मंजू) असे मृतकाचे नाव आहे.बोरगाव मंजू गावाबाहेरून वाशिंबा ते वणीरभापुर शिवारा पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या वळण रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुुरु आहे. बोरगाव मंजू येथील रामजी नगर जवळून जाणाऱ्या महामार्गावर पुलाचे काम रखडलेले आहे. पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. सोमवारी सकाळी या खड्ड्यात एक मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अशोक पितळे, पोलीस कर्मचारी ढोरे, नामदेव केंद्रे, देवराव भोजने यांनी धाव घेऊन मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा केला. युवकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.