आगर : पोळ्याच्या सणानिमित्त गावातील ब्रिटिशकालीन तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार, ६ सप्टेंबर रोजी घडली. मनोज मुरलीधर खांडे (२२) असे मृत युवकाचे नाव आहे.
गावात ब्रिटिशकालीन असलेला तलाव तुडुंब भरला आहे. त्यामुळे पोळ्याच्या निमित्त शेतकऱ्यांनी बैल धुण्यासाठी गर्दी केली होती. मनोज मुरलीधर खांडे (२२) हा वडिलांसोबत तलावात बैल धुण्यासाठी गेला होता. बैल धूत असताना त्याचा पाय घसरल्याने तो तलावात बुडाला. घटनेची माहिती मिळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाचपोर, प्रशांत सनगाळे, नितीन कोलटक्के, विनोद गव्हाळे, विजय पाचपोर, पंकज श्रीनाथ यांनी प्रयत्न करीत त्याला बाहेर काढले. सुरुवातीला आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी युवकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन तलाव परिसराची पाहणी केली. मनोज खांडे हा घरातील कर्ता होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा आप्त परिवार आहे.
---------