अकोला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी गत मे अखेरपर्यंत १ लाख २२८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला असून, जिल्ह्यातील उर्वरित १६ हजार २९३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अद्यापही कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे संबंधित कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र १ लाख १६ हजार ५२१ शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यापैकी गत मे महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख २२८ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला असून, जिल्ह्यातील उर्वरित १६ हजार २९३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अद्यापही कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम केव्हा जमा होणार आणि कर्जमुक्ती योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत संबंधित शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
१ लाख २२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६२८ कोटी जमा !
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी १ लाख २२८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ६२८ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली असून, संबंधित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हयातील पात्र शेतकऱ्यांपैकी १ लाख २२८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ६२८ कोटी रुपयांची रक्कम मे अखेरपर्यत जमा करण्यात आली असून, जिल्ह्यातील १६ हजार २९३ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा होणे बाकी आहे.
- आलोक तारेणीया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक