लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजना आणि मागेल त्याला पीक कर्ज योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला देत, कर्जमाफी आणि पीक कर्जाचा शेतकर्यांना लाभ न देणार्या बँकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी येथे दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा उप निबंधक गोपाळ मावळे, उप विभागीय अधिकारी संजय खडसे, उप जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण उपस्थित होते.कर्जमाफीसंदर्भात बँकांकडून योग्य माहिती देण्यात येत नसल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून प्राप्त होत आहेत. कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी कर्जाची रक्कम शासनामार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र एकही शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत बँकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी दिल्या. ‘मागेल त्याला पीक कर्ज’ योजनेत शासनामार्फत प्रत्येक शेतकर्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगत, येत्या खरीप हंगामासाठी पेरणीपूर्वी शेतकर्यांना पीक कर्ज प्राप्त झाले पाहिजे. त्यासाठी जिल्हा सहकारी बँका व राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे योग्य नियोजन करावे, तसेच या कामाकडे जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. पीक कर्जाच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन, या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ हजार ४00 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही तिवारी यांनी यावेळी दिले. या बैठकीला विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
शेतकर्यांना आरोग्य सेवांचा लाभ द्या!शेतकर्यांचा आरोग्यावरील खर्च करण्यासाठी महात्मा फुले जनकल्याण योजनेंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी शेतकर्यांना लाभ देऊन, शेतकर्यांना सुदृढ आरोग्य सेवांचा लाभ देण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी दिले. जिल्ह्यातील आरोग्यविषयक बाबींचा आढावा घेत, औषधांचा पुरवठा, आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या तक्रारींची माहिती त्यांनी घेतली.
कृषी पंप, पाणी पुरवठय़ाची वीज जोडणी कापू नका!शेतकर्यांना कृषी पंपांसाठी वीज तातडीने देण्याचे सांगत, पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतींची वीज जोडणी कापू नये, त्यासाठी जिल्हा परिषद व वीज वितरण कंपनीने प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश किशोर तिवारी यांनी दिले.
खासगी शाळा शुल्क नियंत्रणासाठी समिती करा!प्राथमिक शिक्षणाचे खासगीकरण झाल्याने, शेतकर्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे खासगी शाळांचे शुल्क नियंत्रणात ठेवण्यासाठी शुल्क निर्धारण समिती गठित करण्याचे निर्देश तिवारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच ग्रामीण भागातील शाळा व आश्रमशाळांमध्ये मुख्यालयी न राहणार्या शिक्षकांवर करण्यात आलेली कारवाई आणि पटसंख्या कमी होत असलेल्या शाळा व त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीदेखील त्यांनी घेतली.