लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करुणा, दया अशा भावना नाहीत.कोणतीही गोष्ट घडली, की फाशी द्या, ही त्यांची सरळ मागणी असते. अशा संघटनांकडून शेतकरी कर्जमाफीची अपेक्षाच नाही. कर्जमाफीचे धोरण जाहीर झाल्यापासून आदेश निघेपर्यंत अटी व शर्तींमध्ये हे धोरण अडकले आहे. मुळात या सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही; मात्र मध्यावधी निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांचा रोष नको म्हणून कर्जमाफी देण्याचे नाटक सुरू केल्याची टीका भारिप-बमसंचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.यासंदर्भात अॅड. आंबेडकर यांनी गुरुवारी काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सरकारने कर्जमाफीच्या अटीमध्ये शेतकऱ्यांना गुंतवले आहे. ज्यांनी दीड लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांनी आधी दीड लाखांवरचे कर्ज भरले तरच त्याचे कर्ज माफ होणार आहे. दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी आपली आर्थिक पत बँकेत वाढावी म्हणून ३० मार्चच्या आत नवीन कर्ज काढले आणि त्या माध्यमातून जुने कर्ज फेडले आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ नाही. तसेच चालू वर्षाचे कर्ज माफ केलेले नाही. ही सारी खेळी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ मिळावा, यासाठीच आहे. भाजपा व संघ हे शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते होणार नाहीत, त्यामुळे शेतीच्या प्रश्नावर लढणारे या संघटनांसोबत राहिले तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.
मध्यावधी निवडणुकांसाठी कर्जमाफीचे नाटक !
By admin | Published: June 30, 2017 1:55 AM