आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेसाठी दोन दिवसांपूर्वी परीक्षार्थींना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, अनेकांच्या प्रवेशपत्रांत चुका असल्याचे निदर्शनास आले. या सर्व गोंधळानंतर ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींमध्ये निराशेचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून आले. अनेक जण परीक्षा केंद्रांवर पोहोचल्यावर परीक्षा रद्द झाल्याचे त्यांना कळले. या प्रकारामुळे परीक्षार्थींना आर्थिक फटकादेखील बसला. त्यामुळे परीक्षार्थींना प्रवास खर्च परत देऊन त्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी रेल्वे आणि बसचे मोफत पास देण्यात यावे. परीक्षार्थींना स्थानिक परीक्षा केंद्र द्यावे. परीक्षार्थींना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून या प्रकरणाची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे हितेश जयदेव जामणिक, राजकुमार दामोदर, धीरज इंगळे, आकाश गवई, विशाल नंदागवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य विभाग पदभरती परीक्षेचा निर्णय घ्या; अन्यथा तीव्र आंदोलन करू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:21 AM