अकोला, दि. २९: महापालिकेच्या हद्दवाढीसाठी शासन स्तरावर नगर विकास विभागात हालचालींना वेग आला असून, हद्दवाढीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होताच ३0 ऑगस्टच्या रात्री किंवा ३१ ऑगस्टला हद्दवाढीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. या कामासाठी महापालिकेचे अधिकारी मंत्रालयात ठाण मांडून बसले आहेत. मात्र वृत्त लिहे पर्यंत संबधीत अधिसूचनेवर मुख्यमंत्र्यांची सही न झाल्याने हद्दवाढीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. २00१ अकोला मनपाची स्थापना झाल्यानंतर १५ वर्षांपर्यंत हद्दवाढीसाठी प्रशासकीय व राजकीय स्तरावर प्रयत्नच झाले नाहीत. शहरालगतच्या गावांचा महापालिकेच्या सुविधांवर ताण पडत असल्याने भौगोलिकदृष्ट्या मनपा क्षेत्राची हद्दवाढ करणे आवश्यक आहे. या दृष्टीने महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश महापालिका क्षेत्रात करण्यासाठीचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे. त्यानंतर हद्दवाढीबाबत नागरिक, संघटनांच्या हरकती-सूचना निकाली काढण्यात आल्या आहेत. मनपाला आता केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, १ सप्टेंबरपर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिल्यानंतर नगर विकास विभागात हद्दवाढीच्या संदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात येत्या २९ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त अजय लहाने यांना नगर विकास विभागात उपस्थित राहण्याची सूचना केल्याने आयुक्तांनी त्यांच्या सक्षम अधिकार्यांना मुंबईला पाठविले असून, हे अधिकारी मंत्रालयात ठाण मांडून आहेत. शासनाच्या हालचाली पाहता ३0 ऑगस्टपर्यंत हद्दवाढीची अधिसूचना जारी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती; पण सोमवारी विधीमंडळात जीएसटी विधेयकावर चर्चा व मतदान झाल्याने मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्री, सचिव, अधिकारी यामध्ये व्यस्त होते. त्यामुळे ३0 ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेपर्यंत हद्दवाढीच्या अधिसूचनेवर सही झाली नव्हती. कदाचित रात्री उशिरा किंवा ३१ ऑगस्टला हद्दीवाढीच्या अधिसूचनेवर सही होईल, अशी अपेक्षा मनपाला आहे. ३१ ऑगस्टला जर सही झाली नाही तर मात्र हद्दीवाढीचा मुद्दा मागे पडू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
-हद्दीवाढीच्या अधिसूचनेवर ३0 ऑगस्ट रोजी सही होण्याची शक्यता होती; पण सही झाली नाही. कदाचित उशिरा रात्री किंवा ३१ ऑगस्टला होईल, असे वाटते. त्यासाठी मनपाचे अधिकारी मंत्रालयातच आहेत. जर ३१ ऑगस्टला सही झाली नाही तर मात्र हद्दवाढीचा मुद्दा मागे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजय लहाने, आयुक्त,महानगरपालिका, अकोला.