अकोला: आचारसंहितेच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी २ सप्टेंबरला दिला. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर संबंधित ठराव ठेवण्यात आले; मात्र जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता पुन्हा लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘त्या’ ठरावांवर या सभेत निर्णय घेता येणार नसल्याने, मंजुरी देण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गत २३ जून रोजी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता लागू असताना, सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध ठरावांना मंजुरी देण्यात आल्याने, आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार करीत, मंजूर करण्यात आलेल्या ठरावांविरोधात जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना सदस्यांच्यावतीने अमरावती विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले होते. आचारसंहिता लागू असताना सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करीत, संबंधित ठराव जिल्हा परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन निर्णय घेण्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी २ सप्टेंबर रोजी दिला. त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर संंबंधित १२ ठराव मंजुरीसाठी घेण्यात आले; मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता पुन्हा लागू करण्यात आल्याने, विषयपत्रिकेवर घेण्यात आलेल्या ‘त्या’ १२ ठरावांवर सर्वसाधारण सभेत निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे या ठरावांना सर्वसाधारण सभेची मंजुरी देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.
जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी १२ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करुन संबंधित ठराव येत्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर ठेवण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार संबंधित ठराव २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आले. परंतू जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने, संबंधित ठरावांवर पुढील सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे.
ज्ञानेश्वर सुलताने
गटनेता, सत्तापक्ष, जिल्हा परिषद.