अकोला: संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून , शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीअकोला जिल्ह्याच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत, मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभीपासून आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. संततधार पाऊस, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागली. पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात हाताशी आलेली पिके बुडाली आहेत. तसेच काही प्रमाणात वाचलेली पिकेदेखील सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिवळी पडून पाण्याखाली बुडालेली आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी सरसकट पिक विम्याचा लाभ देण्यात यावा आणि शासन स्तरावरून मिळणाऱ्या मदतीसाठी जिल्हृयातील सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली.
मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरूंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, पुष्पा इंगळे, शोभा शेळके, किशोर जामनिक, देवराव राणे, शरद इंगोले, प्रतिभा अवचार, अँड. संतोष राहाटे, विकास सदांशिव, सिध्दार्थ शिरसाट, मंगला शिरसाट, सुशील मोहोळ, मोहन तायडे, संगीता खंडारे, मंदा वाकोडे, उज्वला गडलिंग, डॉ. अशोक गाडगे, शिलवंत शिरसाट, बाळासाहेब गडलिंग, श्रावण भातखंडे, गणेश शिंदे, धर्मेंद्र दंदी, बंडू सोळंके, विद्याधर खंडारे, रविंद्र खंडारे, धिरज शिरसाट, जितेंद्र खंडारे, देवानंद तायडे, मनोहर बेलोकार, आनंद खंडारे, डॉ. अशोक मेश्राम, उमेश जामणिक, तेजस्विनी बागडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.