अकोला : शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाने एक शासन निर्णय काढून कृषी विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमांना गुरुवारपासून व्यावसायिक अभ्यासक्रम घोषित करण्यात आले आहे. यासंदर्भात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी राज्यपाल, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री, मुख्य सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या स्तरावर मागणी करून पाठपुरावा केला होता.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली होती. त्यानुसार यासंदर्भात ५ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यात नमूद केल्यानुसार, कृषी परिषदेच्या बैठकीमध्ये ठराव पारित करून शासनास शिफारस करण्यात आली होती. नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय प्राप्त करून घेण्यात आले. हे अभ्यासक्रम व्यावसायिक घोषित नसल्यामुळे खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण होत होता. त्यानुषंगाने, कृषी विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे.यामध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन, एमएससी (कृषी),एमएससी (उद्यानविद्या), एमएससी(वनशास्त्र), एमएफसी,(मत्स्य विज्ञान), एमटेक (अन्न तंत्रज्ञान), एमएससी (कृषी जैव तंत्रज्ञान), एमटेक (कृषी अभियांत्रिकी), एमएससी (गृह विज्ञान), एमएससी (काढणी पश्चात व्यवस्थापन), एमबीए (कृषी), एमबीएम (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), एनएससी (कृषी) कृ षी व्यवसाय व्यवस्थापन, एमएससी (एबीएम) आदी विषयांचा समावेश आहे.