बाळापूर : यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले होते. अनेक शेतकऱ्यांनी भुईमुगाला पसंती देत पेरणी केली होती. सद्यस्थितीत उन्हाळी भुईमुगाच्या काढणीस सुरुवात झाली असून, उत्पादन प्रचंड घट झाल्याचे दिसून येत आहे. लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पूर गेला. त्यामुळे नाल्यातील सिमेंट बंधारे, शेततळे तुडुंब भरून पाणी अडल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला मुबलक पाणीसाठा निर्माण झाला. यावर्षी तालुक्यातील बाळापूर, व्याळा, खिरपुरी, टाकळी खुरेशी, नांदखेड, देगाव, वाडेगाव, धनेगाव, माणकी, कान्हेरी सरप आदी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात उन्हाळी पिकांची पेरणी केली. यामध्ये मूग, ज्वारी, मका व भुईमूग या वाणाची पेरणी केली. मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके काढणी योग्य झाल्याने, शेतकऱ्यांनी गेल्या दोन-चार दिवसांपासून मूग, ज्वारी, मका, तसेच भुईमूग काढणीस सुरुवात केली आहे. यामध्ये ज्वारी व मका या पिकांचे उत्पन्न बऱ्यापैकी होत असले, तरी मूग व भुईमूग या पिकांचे अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी लागलेल्या खर्च इतके ही उत्पन्न होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमध्ये होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भुईमुगाच्या झाडाला केवळ दोन-चार शेंगा आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतात झाडांना एकही शेंग दिसून येत नसल्याने, अनेक शेतकऱ्यांना फक्त जनावरांना चाऱ्यांसाठीच भुईमुगाची काढणी करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांत बोलले जात आहे.
--------------------
यंदाचा खरीप हंगाम धोक्यात !
गत खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे तर बोंडअळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर एकरी एक क्विंटल ही सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. यामुळे खरीप पिकांच्या माध्यमातून उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हातात आला नाही. नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती ; मात्र उत्पादनात घट आल्याने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरल्या गेले असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. सद्या खरीप हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव सुरू आहे. भुईमुगाच्या पिकाने दगा दिल्याने यंदाचा खरीप हंगाम ही धोक्यात सापडल्याचे चित्र आहे.
------------------------------------------------
अडीच एकरात तीन कट्टे
तालुक्यातील नांदखेड शिवारात प्रमोद कवडकार या शेतकऱ्याने आपल्या अडीच एकरात भुईमुगाची पेरणी केली होती. त्यांना अडीच एकरात केवळ तीन कट्टे भुईमुगाचे उत्पादन झाले आहे. लागवडीचा खर्चही वसूल न झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.