शहरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाने हाहाकार घातला आहे. मनपा क्षेत्रात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यात मनपाची दमछाक हाेत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यापासून ते प्रभावी उपाययाेजना राबविण्यात प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरली़ आहे. दुसरीकडे नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. मागील तीन महिन्यांपासून शहरात दरराेज किमान अडीचशे ते तीनशेपेक्षा अधिक जणांना काेराेनाची बाधा हाेत असल्याचे अहवालाअंती दिसून येत होते. यामध्ये ज्यांनी काेराेनाची चाचणी केलीच नाही, अशा बाधितांची मनपाच्या दप्तरी नाेंदच नाही. दरम्यान, बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालात काेराेना बाधितांच्या संख्येत घसरण आल्याचे दिसून आले. यादरम्यान चाचणी करणाऱ्यांच्या संख्येतही घसरण आली असून, ८०३ जणांनी चाचणीसाठी नमुने दिले आहेत.
पूर्व झाेनमध्ये प्रादुर्भाव कायम
मागील काही दिवसांपासून काेराेना बाधितांची संख्या कमी झाली असली, तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. बुधवारी प्राप्त अहवालात पूर्व झाेनमध्ये काेराेनाचा प्रादुर्भाव कायम असल्याचे समाेर आले. या झाेनमध्ये ४९ रुग्ण आढळून आले, तसेच पश्चिम झाेनमध्ये २३, उत्तर झाेनमध्ये १३ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे ३५ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पश्चिम झाेनमध्ये काेराेना बाधितांची संख्या वाढू लागली आहे.