अकोला : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता शासनाने कोविडबाधित रुग्णांना संस्थागत विलगीकरण बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता अहवाल पॉझिटिव्ह आला की घर सोडून संस्थागत विलगीकरणामध्येच राहावे लागेल, या धाकाने अनेक रुग्ण कोविड चाचण्या टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील कोविड चाचणी केंद्रावरील गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या लक्षणीय असली, तरी बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणातच राहत आहेत. अनेकांच्या घरी कोविड नियमावलीनुसार व्यवस्था नसली, तरी त्यांना गृह विलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात आली. शिवाय, अनेकजण बेफिकिरी बाळगून कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात येत होते. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला. ही स्थिती लक्षात घेता शासनाने कोविडबाधित रुग्णांंना आता संस्थागत विलगीकरणामध्ये राहण्याचे बंधनकारक केले. त्यामुळे आता काेविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला की, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णाला संस्थागत विलगीकरणामध्ये राहावे लागणार आहे. घर सोडून जाण्याच्या धाकाने अनेकजण कोविड चाचणी टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रामुख्याने शहरी भागात चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.
मागील सात दिवसांतील तपासणीचे प्रमाण (आरटीपीसीआर) तारीख - झालेल्या चाचण्या
२४ मे - १७०२
२५ मे - १४३७
२६ मे - २४१३
२७ मे - ८८६
२८ मे - १८२९
२९ मे - १५९४
३० मे - १८६०
नागरिकांनी लक्षणे दिसल्यास अंगावर काढू नये. कोविडचा गंभीर परिणाम होऊ नये, यासाठी लक्षणे दिसताच कोविड चाचणी करून घ्यावी. योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास कोरोना लवकर ठीक होऊ शकतो.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला