शेतकरी आर्थिक संकटातमहान : मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महान व परिसरातील शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात कांद्याची लागवड केली होती.तुरीचे पीक एक महिना पुढे ढकलल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव फेब्रुवारी महिन्यात कांद्याची लागवड करावी लागली. सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकास रासायनिक खते, कीटकनाशक फवारणी, निंदन इत्यादवर खर्च केला. दोन महिन्याच्या कालावधीनंतर कांदा परिपक्व होतो. कांदा परिपक्व झाला की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. परंतु यावर्षी उष्णतापमान दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उन्हाचा चटका कांद्याने सहन न केल्यामुळे कांद्यची उभी पाल झपाट्याने खाली कोसळली. नाइलाजास्तव शेतकऱ्यांनी कांद्याला उपटण्यास सुरुवात केली असता कांदा एकसारखे परिपक्व झाले नसून त्यामध्ये तीन प्रकारचे आकार झाले आहेत. त्या कारणामुळे या वषी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट निर्माण होणार. अगोदरच शेतकरीवर्ग वैतागला असून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.कांदापिकास लावगडीपासून ते कापण्यापर्यंत एकरी ३५ हजार रुपयाच्या वर खर्च शेतकऱ्यांना येतो. अन् भाव पाहिले तर पाच ते सहाशे रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारात आहेत. दरवर्षी पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना चार ते पाच वर्षापासून तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच यावर्षी उष्णतापमानाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. उष्णतापमानामुळे यावर्षी शेतकऱ्यांन कांद्याच्या पिकात ५० टक्क्याहुन अधिक घट होणार आहे. खरिपासह रब्बीतही शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याकारणामुळे महान व परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या संकटात सापडले आहे.
मागच्या वर्षी कांद्याला भाव अत्यंत कमी प्रमाणात असल्याने लावलेला खर्चही काढता आला नव्हता. त्या कारणाने मी यावर्षी केवळ एकच एकरात कांद्याची लागवड केली असून मला सुरुवातीपासून शेवटपर्यंत ३५ ते ३६ हजार रुपये खर्च आला आहे. उष्णतापमानामुळे कांद्याची पाल लवकर पडल्याने कांदा परिपक्व झाला नाही. त्यामुळे उत्पन्नात घट येत आहे.- अ. रशीद शे. कालू, कांदा उत्पादक, महान.