अकोला : वयोवृद्धांसह गर्भवतींनाही कोविडचा धोका असून, गत दहा महिन्यात जिल्ह्यात ११० कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती झाली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने गर्भवतींसाठी घातक ठरले. नोव्हेंबरपासून मात्र गर्भवतींमध्ये कोविडचे प्रमाण घटल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर वयोवृद्धांसोबतच गर्भवतींमध्येही कोविडचे रुग्ण आढळून येऊ लागले. त्या अनुषंगाने जिल्हा स्री रुग्णालय प्रशासनाने विशेष खबरदारी घेत कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागातून येणाऱ्या गर्भवतींसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना केली. अशा गर्भवतींसाठी सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती कक्ष राखीव ठेवण्यात आले. आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे गर्भवतींमध्ये कोविडच्या फैलावाला ब्रेक लागला; मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने गर्भवतींसाठी घातक ठरले असून, याच काळात बहुतांश कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती झाली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात गर्भवतींमध्ये कोविड संसर्गामध्ये कमालीची घट झाली असून, आता क्वचितच पॉझिटिव्ह गर्भवती प्रसूतीसाठी येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
६० टक्के प्रसूती सिझेरिअन
मागील दहा महिन्यात जिल्ह्यात ११० कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती झाली. यापैकी जवळपास ६० टक्के प्रसूती सिझेरिअनने हाेत्या. कोरोनाबाधित गर्भवतीच्या प्रसूतीचे आरोग्य विभागासमोर मोठे आवाहन होते.
एकाही शिशूला नाही कोविडची बाधा
कोविडबाधित गर्भवतींच्या प्रसूती झाल्या, तरी आतापर्यंत एकाही शिशूला जन्मानंतर कोविडची बाधा झालेली नाही. हे आरोग्य विभागाचे मोठे यश आहे.
कोविडबाधित गर्भवतींची प्रसूती वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आव्हानात्मक होते. त्यांच्यापासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तसेच नवजात शिशूंनाही संसर्ग होण्याची भीती होती. परंतु, आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीमुळे हे आव्हान यशस्वी पेलल्या गेले. सध्या गर्भवतींमध्ये कोविड संसंर्गाचे प्रमाण घटले आहे.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला