माध्यमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा
बार्शिटाकळी : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोविडची लस द्यावी, असे निवेदन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना मुख्याधापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी विदर्भ मुख्याधापक संघाचे अध्यक्ष शत्रुग्न बिरकड, जिल्हा अध्यक्ष बळीराम झामरे, जिल्हा सचिव दिनेश तायडे, सदस्य विलास खुमकर, प्रेमकर सानप हजर होते.
भारत निर्मल शौचालय योजनेचा बोजवारा
पातूर : शहरासह तालुक्यामध्ये भारत निर्माण योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र नियोजनशून्य कारभारामुळे योजनेचा बाेजवारा उडाला आहे. ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावरच शौचास जात असून, ग्रामीण भागांमध्ये विविध रोगांना आमंत्रण मिळत असून, प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.
मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे नागरिक त्रस्त
निहिदा : गेल्या दोन महिन्यांपासून खासगी कंपनीचे मोबाइल नेटवर्क व्यवस्थित चालत नसल्याने पिंजर परिसरातील मोबाइलधारक कमालीचे त्रस्त झाले आहे, माेबाइल कंपन्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून गावागावात टॉवर उभारले; परंतु नेटवर्कच्या सुविधेकडे लक्ष दिले जात नाही, ग्राहकांनी तक्रार किंवा फोनवर सूचना दिली तर त्याची दखल घेतली जात नाही यामुळे ग्राहक अधिकच हैराण झाले आहेत.
शेतकरी, मजुरांना मास्कचे वाटप
बार्शिटाकळी : तालुक्यातील तिवसा येथे पीकपाहणी कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकरी व मजुरांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी काेराेना नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना जागरूक करण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
घरकुलांसाठी रेती उपलब्ध करून द्या
मूर्तिजापूर : जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना व शासनाचे इतर योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुलांची योजना मंजूर आहे. परंतु घरकुलांसाठी लागणारी रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. तसेच काही परिसरामध्ये रेती घाट नाहीत अशावेळी घरकूल उभारणीस अडचण येत असल्याने घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
निधीअभावी खेट्री गावाचा विकास थांबला!
खेट्री : खेट्री गावाचा विकास गेल्या तीन वर्षांपासून निधीअभावी खुंटला आहे. गावातील विविध विकासकामांचा आराखडा तयार करून ग्रामपंचायतीने संबंधित कार्यालयात सदर करून वारंवार लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी केली. परंतु गेल्या तीन वर्षांपासून निधी मिळाला नसल्याने गावाचा विकास थांबला आहे.
पातूर येथील क्रीडा संकुलाची दुर्दशा
पातूर : ग्रामीण भागातील क्रीडापटूंना संधी उपलब्ध व्हावी, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. शहरातील क्रीडा संकुलची दुर्दशा झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, शहरातील क्रीडा संकुल अपुऱ्या जागेत असून, अर्धवट बांधकामामुळे मूळ उद्देशालाच बगल बसल्याचा वास्तव समोर आले आहे.
मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दयनीय अवस्था!
मूर्तिजापूर : कारंजा लाड या मार्गाला जोडणाऱ्या मूर्तिजापूर-खेर्डा रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिग्रस खुर्द-दिग्रस बु. रस्त्याचे काम संथगतीने!
दिग्रस बु : गत वर्षभरापूर्वी पातूर तालुक्यातील दिग्रस खु.-दिग्रस बु. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. सद्य:स्थितीत या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रुग्णवाहिकेची दुरवस्था; रुग्णांची गैरसोय
उरळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका दि.८ फेब्रुवारीपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे रुग्णांना अकोला येथे उपचारासाठी पाठवता येत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच गोरगरीब रुग्णांना खासगी वाहनातून उपचारार्थ जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.