लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्थेतर्फे भीम जयंती
तेल्हारा : येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्थेच्या वतीने वाचनालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी मुख्याध्यापक गजानन रेवस्कर, गणेश तायडे, प्र. सु. ढोकणे, सेवकराव हेरोडे, श्रीकृष्ण पोहरकार, नागोराव वानखडे उपस्थित होते.
रेतीची चोरी, दोघांविरुद्ध गुन्हा
पारस : पोलिसांची गस्त सुरू असताना, पारस रस्त्यावर मध्यरात्री रेतीने भरलेले वाहन पोलिसांनी पकडले. परवाना नसल्याने नीलेश गजानन चराटे (२४, रा. मनसगाव), गणेश अशोक शेळके (३०, रा. भोनगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई पीएसआय अनिता इंगळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
लाभार्थी बैलबंडीपासून वंचित
आगर : आगर येथे विशेष घटक योजनेतील पात्र शेतकऱ्यांना २०१६-१७ मध्ये बैलबंडी मंजूर करण्यात आली होती. परंतु, चार वर्षांपासून शेतकऱ्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने बैलबंडी उपलब्ध करून दिली नाही. याबाबत माजी सरपंच राजेंद्र तेलगोटे यांनी निवेदन देऊन लाभार्थींना बैलबंडी देण्याची मागणी केली आहे.
हाता येथे विकासकामांना प्रारंभ
हाता : हाता येथे विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकारातून गावात विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. गावातील अंतर्गत रस्ते, पथदिवे उभारण्यात येत आहेत. सरपंच कविता रवी मनसुटे, उपसरपंच नितीन दामोदर यांनी विकासकामांकडे लक्ष दिले आहे.
शेती मशागतीच्या कामाला वेग
चोहोट्टा बाजार : परिसरात व गावांमध्ये शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे. नुकसान हरभरा, गव्हाचा हंगाम संपल्यामुळे उलंगवाडी झाली आहे. शेतकरी सध्या शेतीच्या कामात गुंतले असून, शेतातील काडीकचरा वेचण्यावर भर देत आहेत.
देवरी फाटा येथे नियमांकडे दुर्लक्ष
चोहोट्टा बाजार : परिसरातील देवरी फाटा येथे संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतरही दुकाने सुरू राहत आहेत. तसेच बसस्थानकावर गर्दी होत असल्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. याकडे दहीहांडा पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.