अकोला : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या शहरातील दोन भाविकांनी दाखविलेली भूतदया व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला रविवारी नवजीवन मिळाले.शहरातील प्रकाश उजाडे व आशिष नराजे हे दोघे रविवारी घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी गायगाव मार्गावरील एखाद्या चांगल्या विहिरीच्या शोधात होते. गायगाव मार्गाने जात असताना भौरद शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळच्या परिसरात त्यांना एक विहिर दिसली. विहिरीजवळ जाऊन पाहिले असता, त्या कोरड्या विहिरीत हरणाचे पाडस पडलेले दिसून आले.
तब्बल तीस फुट कोरड्या विहिरीत पाडस पडल्याचे पाहुन भूतदया जागृत झालेल्या दोघांनी तातडीने मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली. बाळ काळणे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी ओवे आणि वनपाल गीते यांना पाडस विहिरीत पडलेले असल्याबाबत कळविले. त्यानंतर बाळ काळणे, प्रविण सरप आणि अनिल चौधरी तीघे घटनास्थळी पोहचले. कोरड्या विहिरीतून पाडसाला बाहेर काढण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पाडसाला बाहेर काढल्यानंतर ते पूर्णपणे सुखरुप व तंदुरुस्त असल्याची खात्री पटल्यानंतर शेतशिवारातील हरणाच्या कळपात सोडण्यात आले. सोडता क्षणीच पाडसाने धुम ठोकली व ते कळपात मिसळल्याचे पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला.