अतुल जयस्वाल । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वीज देयक न भरणार्या वीज ग्राहकांना महावितरणने आणखी एक ‘शॉक’ देण्याचा निर्णय घेतला असून, थकबाकीदार ग्राहकांना आता महावितरणच्या २४ तास सुरू असणार्या टोल फ्री क्रमांकावरूनही प्रतिसाद मिळणार नाही. या ऑनलाइन सेवेची कवाडे थकबाकीदारांसाठी बंद होणार असून, या क्रमांकावर त्यांना कोणतीही तक्रार नोंदविता येणार नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, थकबाकीदारांना आता या सेवेपासून वंचित राहावे लागणार आहे.राज्यभरात महावितरणचे लाखो ग्राहक असून, या ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी महावितरण नेहमीच प्रयत्नशील असते. वीज ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक तत्काळ व्हावी, या उद्देशाने महावितरणने केंद्रीय तक्रार निवारण कक्ष निर्माण केले असून, यासाठी टोल फ्री क्रमांक आहेत. मुंबई व पुणे येथे असलेल्या या केंद्रीय कक्षांमध्ये १९१२, १८00२00३४३५ किंवा १८00२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकांवरून संपर्क साधता येतो. या ठिकाणी असलेले प्रतिनिधी वीज ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेतात व ग्राहक ज्या जिल्हय़ातील असेल, तेथील महावितरणच्या संबंधित विभागाला त्याच्या तक्रारीची माहिती देतात. या ठिकाणी दूरध्वनीवरून संपर्क साधणार्या ग्राहकाला त्याचा ग्राहक क्रमांक सांगावा लागतो. महावितरणकडे वीज ग्राहकाचा मोबाइल क्रमांक आधीच नोंदणी झालेला असेल, तर त्याला ग्राहक क्रमांक सांगण्याची गरज नसते. या कक्षांमध्ये तक्रार नोंदविण्यासाठी दूरध्वनी करणार्या ग्राहकाचा ‘स्टेट्स’ समोर येतो. जर संबंधित ग्राहकाकडे वीज बिलाची रक्कम थकीत असेल, तर त्याची तक्रार यापुढे नोंदवून घेतली जाणार नाही. थकबाकीदार ग्राहकांना वठणीवर आणण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. थकबाकीदार ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदविता येणार नसल्यामुळे त्यांची आता गोची होणार आहे.
वीज बिलाबाबत तक्रार असलेल्यांना मुभाएखाद्या वीज ग्राहकाची वीज बिलाबाबत तक्रार असेल व त्यामुळे त्याच्याकडे रक्कम थकीत असेल, तर अशा ग्राहकांना यामधून वगळण्यात आले आहे. तक्रार असलेल्या वीज ग्राहकांना टोल फ्री क्रमांकावरून प्रतिसाद मिळेल. तथापि, अशा ग्राहकांच्या तक्रारीची नोंद महावितरणकडे असणे आवश्यक आहे.