लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : रामायणात कु-प्रसिध्द असलेल्या रावणाला दहातोंडे होती. दहातोंडी रावणाने एकाच सीतेचे हरण केले. मात्र, हल्लीच्या काळात एकतोंडी रावण समाजाचे शोषण करीत आहेत. संस्कार-सेवा आणि सपर्मण भावनेतून या रावणांचा बिमोड करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी येथे केले.
शेलोडी येथील जागृती ज्ञानपीठ येथे आयोजित विद्यार्थी मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील हेगडेवार रक्तपेढीचे संचालक निलेश जोशी होते. यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, रामायणातील दशासन असलेला रावण अंहकारी असला तरी, त्याची भक्ती श्रेष्ठ होती. मात्र, वाईट कृतीमुळे त्याची सोन्याची लंका रसातळाला गेली. जीवनातून संस्कार वजा केले की, मनुष्याची अधोगती होते, असे ते म्हणाले. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जागृतीचे प्रशासन अधिकारी अशोक राऊत, ज्येष्ठ सदस्य प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी निलेश जोशी यांनी संस्कार नसतील तर जीवन अर्थहीन असल्याचे सोदाहरणांसह पटवून दिले. जागृती ज्ञानपीठच्या विद्यार्थ्यांनीही यावेळी आपली मनोगत व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक संदीप गोळे यांनी केले. प्रास्ताविक अशोक राऊत यांनी तर संचालन प्रशांत कारंजकर यांनी केले. आभार जागृती ज्ञानपिठच्या शिक्षिका कुळकर्णी यांनी मानले.