अकोला, दि. २३- महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया गुरुवारी खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे पार पडली. यावेळी उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतदान प्रतिनिधींनी उत्साहाच्या भरात केलेली आकडेमोड चुकीची ठरल्याने उमेदवारांचा जय-पराजयाबाबत अफवा शहरभर पसरली. या प्रकारामुळे उमेदवारांची प्रचंड घालमेल झाली. तर अधिकार्यांचीही तारांबळ उडाली होती. मनपाच्या निवडणूक विभागाने यासाठी जय्यत तयारी केली होती. प्रभाग पुनर्रचनेदरम्यान २0 प्रभाग उदयास आले. प्रभागांची संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने एका झोन अंतर्गत चार प्रभाग यानुसार पाच झोनचे गठन करून निवडणूक निर्णय अधिकार्यांची नियुक्ती केली. मतमोजणीच्या दिवशी झोननिहाय प्रभागांच्या मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. यावेळी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना मतमोजणीला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. यांचा उडाला गोंधळप्रभाग १२ मधील उमेदवार काँग्रेसच्या उषा विरक अवघ्या २७ मतांनी पराभूत होऊन भाजपच्या शीतलबेन रूपारेल विजयी झाल्याची वार्ता वार्यासारखी पसरली. प्रभाग १९ मधील भाजपचे उमेदवार संजय बडोणे १९२ मतांनी पराभूत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज गावंडे विजयी झाल्याची दिशाभूल करणारी माहिती पसरली. प्रभाग १६ मध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनेल विजयी झाल्याची माहिती मिळताच काही क्षणासाठी विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. प्रभाग १४ मधील शिवसेना उमेदवार मंगेश काळे ५३ मतांनी पराभूत झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रभागातील उमेदवारांनी मतमोजणीच्या ठिकाणी धाव घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली असता ही सर्व माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे समोर आले.
पराभव अन विजयाच्या अफवेने उमेदवारांची घालमेल !
By admin | Published: February 24, 2017 2:49 AM