- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: शासनाने इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ असलेल्या तसेच जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी तसेच प्राविण्य मिळविलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. यासंदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने सोमवार, १८ मार्च रोजी राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्र पाठवून सूचित केले आहे.सुधारित नियमानुसार सन २०१८-१९ या शालेय वर्षापासून क्रीडा गुणांची सवलत दयायची आहे. सुधारित निर्णयानुसार क्रीडा गुण सवलतीसाठी जिल्हा व विभागस्तरीय स्पर्धेचा समावेश झाल्याने सुधारित बदलाची दुरुस्ती करण्याबाबत संबंधित यंत्रणेस संचालनालयाद्वारे कळविण्यात आले आहे. तथापि, असे खेळाडू क्रीडा गुणांपासून वंचित राहू नयेत, याकरिता फक्त जिल्हा व विभागीय स्पर्धेतील खेळाडू विद्यार्थ्यांचेच अर्ज आॅफलाइन स्वीकारले जाणार आहेत. शालेय क्रीडा स्पर्धेत काही खेळ प्रकारात प्रथम पाच क्रमांकापर्यंत प्रावीण्य असलेल्या खेळाडूंना प्रावीण्य प्रमाणपत्र दिले जात असले, तरीही सुधारित नियमानुसार फक्त प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या खेळाडू विद्यार्थ्यास क्रीडागुणाची सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.सुधारित शासन निर्णयामधील परिशिष्ट ११ मधील नमूद क्रीडा प्रकारांच्या विभागीय शालेय स्पर्धा आयोजकांनी खेळनिहाय सहभागी तसेच प्रावीण्यानुसार खेळाडूंच्या याद्या आपल्या विभागातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांना सादर कराव्यात. यामधील माहितीच्या आधारे विभागीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंना नियमानुसार क्रीडा गुणांची शिफारस करावी. इयत्ता दहावी पूर्वी खेळाडू विद्यार्थ्याने प्रावीण्य मिळविलेले असले तरी सवलतीचे गुण मिळण्याकरिता अर्जदार खेळाडू हा अर्ज सादर केलेल्या आर्थिक वर्षात त्याच खेळ प्रकारात किमान तालुका अथवा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला असल्याची खात्री करू नच क्रीडागुणांची शिफारस करावी. क्रीडा गुण सवलतीस पात्र असलेल्या एकविध खेळांच्या राज्य संघटनांची यादी संचालनालयामार्फत १० एप्रिलपर्यंत कळविण्यात येईल. तत्पूर्वी, परिशिष्ठ ११ मधील नमूद खेळांमधील प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छानणी करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करू न घ्यावी. जिल्हा, विभागीय स्पर्धेतील किमान तीन संघ किंवा खेळाडू सहभागी नसतील अशा प्रकरणांमध्ये प्रावीण्य प्रमाणपत्र वितरित केले जात नाही. अशा प्रकरणात जिल्हा व विभागीयस्तरीय क्रीडा स्पर्धेतील प्रोव्हिजनल प्रमाणपत्रे त्या-त्या कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या अभिलेख्याच्या आधारे वितरित करावीत, अशा सूचना या पत्रामध्ये सहसंचालक एन.एम.सोपले यांनी नमूद केलेल्या आहेत.