लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनपा शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याची देखभाल व्हावी या उद्देशातून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांच्या पुढाकारातून सुमारे दोन महिन्यांपूर्वी ‘हाइजीन किट’चे वाटप करण्यात आले होते. यादरम्यान, आजपर्यंत १,३९० किटपैकी ८१६ किटचे वाटप करण्यात आले असले तरीही ५८० किटचे वाटप झाले नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.महापालिकेतील महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने गरजू व पात्र महिलांसाठी शिलाई मशीन तसेच मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप, हाइजीन किट वाटप यासह विविध योजनांचा समावेश आहे; परंतु मागील सहा वर्षांपासून या विभागामार्फत कोणतीही योजना राबविण्यात आली नाही, हे विशेष. कोरोना विषाणूच्या संकटामुळे मनपा शाळेतील विद्यार्थिनींना हाइजीन किटचे सामूहिकरित्या वाटप न करता सभापती मनीषा भन्साली यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुख्याध्यापकांना २५ किटचे वाटप केले होते. त्यानंतर मुख्याध्यापकांनी सर्व किटचे वाटप करणे अपेक्षित होते; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून ५८० किटचे वाटप रखडल्याची माहिती समोर आली आहे.
सभापतींनी मागितली माहितीविद्यार्थिनींना हाइजीन किटचे वाटप झाले किंवा नाही, यासंदर्भात संबंधित विद्यार्थिनींचे नाव तसेच आधार कार्डसहित माहिती देण्यासंदर्भात सभापतींनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना पत्र दिले. प्राप्त पत्रानुसार शिक्षण विभागाने सभापती भन्साली यांना केवळ किटच्या संख्येबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे.