अकोला : बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांना शासनाकडून महाराष्ट्र कंझ्युमर्स को-आॅपरेटिव्ह फेडरेशनमार्फत केल्या जाणाऱ्या धान्याच्या पुरवठ्यात हळद, मिरची पावडर एगमार्कऐवजी खुल्या बाजारातील पॅकिंगमध्ये दिली जात आहे. त्याचवेळी अकोला जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उशिराने पुरवठा केल्याप्रकरणी पुरवठादार कंझ्युमर्स को-आॅपरेटिव्ह फेडरेशनला सतत तिसऱ्यांदा दंड करण्यात आल्याची माहिती आहे.राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने महाराष्ट्र कंझ्युमर्स को-आॅप. फेडरेशनकडून तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेल्या कच्च्या धान्याच्या पुरवठा सुरू केला. त्यामध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात उघड झाला. बालकांचा आहार त्यांच्यापर्यंत ठरलेल्या वेळापत्रकानुसार न पोहोचणे, पुरवठादारांकडून ठरलेल्या गुणवत्तेचा आहार न मिळणे, यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. कुपोषणग्रस्ततेचा डाग पुसून माता-बालमृत्यू रोखणे, बालकांना सुदृढ आरोग्याची हमी देण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणारा पोषण आहार पुरवठा योजनेचा सातत्याने बट्ट्याबोळ केला जात आहे. या प्रकाराच्या अनेक तक्रारी तसेच नमुनेही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सादर करण्यात आले. पुरवठादाराकडून दिल्या जाणाºया भेसळयुक्त वस्तूंमुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले. त्याचा चौकशी अहवाल राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. त्याचवेळी ठरवून दिलेल्या वेळेत पुरवठा न केल्याने पुरवठादाराला दंड करण्याची वेळही महिला व बालकल्याण विभागाला आली आहे. बाळापूर तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये तब्बल आठ दिवस विलंबाने पुरवठा करण्यात आला. त्या पुरवठा केल्याच्या धान्याच्या किमतीच्या ०.५ टक्के दराने पुरवठादार महाराष्ट्र कंझ्युमर्स को-आॅपरेटिव्ह फेडरेशनला दंड करण्यात आला. त्यापूर्वी अकोला ग्रामीण एक आणि दोनमध्येही पुरवठादाराला दंड झाला आहे. त्यामुळे पुरवठादार ऐन पावसाळ्याच्या दिवसांत बालक, गरोदर, स्तनदा मातांना आहार पुरवठा करण्यात किती हलगर्जी करीत आहे, हे स्पष्ट झाले आहे.
- करारनाम्यात एगमार्क, पुरवठा भलत्याच पॅकिंगमध्येआहार पुरवठ्यासाठी कंझ्युमर्स फेडरेशनच्यावतीने महिला व बालकल्याण आयुक्त इंद्रा मालो तर महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह फेडरेशनच्यावतीने संचालक, अतिरिक्त कार्यकारी संचालक एन. एस. खटके यांच्यामध्ये करारनामा करण्यात आला आहे. त्यामध्ये हळद व मिरची पावडर एगमार्कची असावी, असा स्पष्ट उल्लेख असताना पुरवठादाराने एगमार्कऐवजी भलत्याच पॅकिंगमध्ये या वस्तूंचा पुरवठा केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे पुरवठादाराकडून कमी भाव आणि दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा होत असल्याचेही चौकशीतून पुढे आले आहे.