आजीबाईच्या बटव्यात काय?
दररोज दिवसातून दोन वेळा काढा बनवून पितो. या काढ्यामध्ये सुंठ, मीरे, तुळशीची पाने, हळद आणि गूळ आदी घरगुती औषधोपयोगी मसाल्यांचा समावेश आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. माझ्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनाही हा काढा देते.
- विमलबाई आखरे, वृद्ध महिला
घरीच उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक साधनांपासून काढा तयार केला जातो. त्याचे सेवनही नियमाप्रमाणेच केला जात असल्याने कुटुंबात सर्वांनाच या काढ्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती टिकून राहणे आवश्यक.
-मंगलाबाई देशमुख, वृद्ध महिला
आयुर्वेदात उपचाराच्या दोन पद्धती आहेत. स्वस्थ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेणे. तसेच कोणी आजारी पडल्यास त्याच्या आजाराला मुळापासून काढणे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधे समान मात्रेत असणे गरजेचे आहे. काढ्याची मात्रा निश्चित असायला हवी. दिवसातून ३० मिलिलिटरपेक्षा जास्त घेऊ नका. कोरोना काळात गुळवेलचा काढा जास्त लाभदायी ठरत आहे.
- डॉ. कृष्णमुरारी शर्मा, आयुर्वेदिक महाविद्यालय, अकोला
कशाचा काय फायदा होतो
गुळवेलचा काढा
कोरोना काळात गुळवेलचा काढा प्रभावी ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गुळवेल ही रोगप्रतिकारकशक्ती बळकट ठेवण्याचे काम करते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्याने कोरोनासोबतच इतर आजारांपासूनही संरक्षण मिळते.
रसायन औषधे
घरगुती काढ्यात वापरण्यात येणारे बहुतांश घटक हे आयुर्वेदशास्त्रानुसार रसायन औषधे आहेत. ते रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासोतबच आजाराला मुळापासून नष्ट करण्याचे कामही करते. त्यामुळे घरगुती काढाही आरोग्यासाठी लाभदायी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अती प्रमाण नको
काढा हा आरोग्यासाठी चांगलाच आहे, मात्र कुठल्याही गोष्टीचे प्रमाण अती झाल्यास त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. काढ्याचेही तसेच आहेत. काढा हा प्रामुख्याने रसायन औषध असल्याने दिवसातून केवळ ३० मि.लि. पेक्षा जास्त सेवन करू नये, असा सल्लाही वैद्य देतात.