- अतुल जयस्वाल
अकोला : केवळ रक्त न मिळाल्याने कोणाचा मृत्यू होता कामा नये, यासाठी रक्तदानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने केरळ राज्यातील तिरवनंतपूरम येथून २८ डिसेंबर २०२१ पासून पदयात्रेस सुरुवात केलेला दिल्ली येथील किरण वर्मा नामक ३७ वर्षीय अवलीया तब्बल ५७०० किलोमीटरचा पायी प्रवास करत मंगळवारी (२६ जुलै) अकोल्यात पोहोचला. थंडी, ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता पदभ्रमंतीवर असलेल्या या तरुणाने येत्या दोन वर्षांत २१ हजार किलोमीटर प्रवास करत दिल्लीला पोहोचण्याचा संकल्प केला आहे.
दिल्ली येथील एका मोठ्या शिक्षण समूहातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून २०१६ पासून रक्तदान चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या किरण वर्मा यांनी 'चेंज विथ वन फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेंतर्गत 'सिंपली ब्लड' व 'चेंज विथ वन मिल' हे दोन उपक्रम सुरू केले आहेत. कोविड काळात गत दोन वर्षांपासून देशात ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण घटले असून, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी लोकांना रक्तदानाप्रती जागृत करण्याच्या उद्देशाने किरण वर्मा यांनी २८ डिसेंबर २०२१ पासून केरळ राज्यातील तिरवनंतपूरम येथून पदयात्रेस प्रारंभ केला. आतापर्यंत त्यांनी केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातील तसेच पुदुच्चेरी व दिव-दमन या केंद्रशासित प्रदेशांमधील ७२ जिल्ह्यांमधून पायी प्रवास केला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव व बुलडाणा असा प्रवास करत ते २६ जुलै रोजी अकोला येथे आले. येथे त्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांची भेट घेतली व २७ जुलै रोजी ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले. येथून ते अमरावती, नागपूर व इतर जिल्ह्यांमध्ये जाणार आहेत. यापूर्वी वर्ष २०१८ मध्ये वर्मा यांनी १६००० किमीचा प्रवास केला होता. यापैकी ६००० किमीचा प्रवास पायी केला होता.
पायाला दुखापत, तरीही पदयात्रा
पदयात्रा सुरू असताना किरण वर्मा यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. या दुखापतीवर किरकोळ उपचार करून व पायातील जोड्यांमध्ये थोडा बदल करून ते पायी प्रवास करत आहेत. अकोल्यातून अमरावतीकडे रवाना होताना शिवरजवळ दुखापत वाढल्याने किरण वर्मा बसने अमरावतीपर्यंत गेले. तेथे उपचार केल्यानंतर एक दिवसाची विश्रांती घेऊन पुढील पदयात्रा करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.
...म्हणून झोकले रक्तदान चळवळीत
किरण वर्मा यांनी २६ डिसेंबर २०१६ रोजी छत्तीसगढ राज्यातील रायपूर येथील एका रुग्णासाठी डोनर म्हणून रक्त दिले होते. त्यांनी मोफत दिलेल्या रक्तासाठी एका मध्यस्थाने त्या रुग्णाकडून १५०० रुपये वसूल केले. वैद्यकीय बिल भरण्यासाठी त्या रुग्णाच्या पत्नीला देहविक्रय करावा लागल्याची माहिती किरण वर्मा यांना मिळाली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्याच दिवशी त्यांनी नोकरी सोडली व वर्ष २०२५ पर्यंत देशात रक्ताअभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी कार्य करण्याचे ध्येय निश्चित केले.
पदयात्रे दरम्यान ४२ रक्तदान शिबिरे
किरण वर्मा यांनी पदयात्रा सुरू केल्यापासून त्यांच्या समर्थनार्थ आतापर्यंत विविध ठिकाणी ४२ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये ६५५६ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी पदयात्रेदरम्यान १५०० रक्तदात्यांची फळी उभी केली असून, या दात्यांनी विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान केले आहे.
आपल्या देशात दररोज हजारो रुग्णांना रक्ताची गरज भासते, परंतु सर्वांनाच रक्त मिळतेच असे नाही. रक्तदानासाठी स्वेच्छेने लोक पुढे आले तर देशात रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही व कोणालाही रक्ताअभावी प्राण गमवावे लागणार नाहीत.
- किरण वर्मा, प्रणेता, 'चेंज विथ वन फाउंडेशन', नवी दिल्ली