‘अर्ज एक,योजना अनेक’; 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
अकोला - कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींकरिता अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुंनी आपला वैयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित
अकोला,- महाडीबीटी या प्रणालीद्वारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्तीचे सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील अर्ज हे महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत. हे अर्ज सर्व संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तत्काळ नियमानुसार तपासणी व पडताळणी करून जिल्हा कार्यालयास सादर करावे, असे सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी कळविले आहे.
रॅपिड टेस्ट: ५० चाचण्या
अकोला- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टिजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या ५० चाचण्या झाल्या. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. बार्शीटाकळी येथे तीन, अकोला आयएमए येथे पाच तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या १३ चाचण्या झाल्या, त्यात एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.