अकोला: राज्यात सर्वत्र कोविडच्या डेल्टा व्हेरिअंटचा धोका वाढत असतानाच जिल्ह्यात डेल्टाचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खळबळून जागे झाले. अकोट शहरातील या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून तो डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल तब्बल ४३ दिवसांनी प्राप्त झाला आहे. दरम्यानच्या काळात त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किती लोकांना कोरोनाची लागण झाली, तसेच संपर्कातील पॉझिटिव्ह रुग्ण किती लोकांच्या संपर्कात आले याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. प्राप्त माहितीनुसार, अकोट शहरातील एका ५२ वर्षीय शिक्षकाला जून महिन्याच्या अखेरीस कोविडची लागण झाली होती. त्यावेळी या रुग्णाला कोविडचे सौम्य लक्षणे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नियमानुसार विलगीकरणाचे दिवस पूर्ण केल्यानंतर रुग्णांने आपल्या दैनंदिनीला सुरुवात केली होती. याच दरम्यान या पॉझिटिव्ह रुग्णाचे ‘आरएनए’ पॉझिटिव्ह सॅम्पल डेल्टा तपासणीसाठी दिल्ली येथील ‘जीनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूड’ (आयजीआयबी) मध्ये पाठविण्यात आले होते. त्यामध्ये या रुग्णाचा ‘आरएनए’ सॅम्पल डेल्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, मात्र हा अहवाल तब्बल ४३ दिवसांनी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी प्राप्त झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रोमध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
तो रुग्ण निगेटिव्ह
अकोट शहरात आढळलेला डेल्टाचा पॉझिटिव्ह रुग्ण हा सद्यस्थितीत ठणठणीत आहे.
आरोग्य विभागामार्फत त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रुग्णासोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्य व इतर लोकही निगेटिव्ह असल्याची माहिती आहे.