अकोला: जिल्ह्यात बायो-डीझेल (बी-१००)च्या नावाखाली भेसळयुक्त इंधनची सर्रास विक्री सुरू असून, यामुळे नागरिकांची फसवणूक वाढली आहे. त्यामुळे अशा भेसळयुक्त इंधन विक्री करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करून, असे केंद्र बंद करण्याची मागणी वाशीम-अकोला पेट्रोलीयम डीलर असोसिएशनने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वाशिम-अकोला पेट्रोलीयम डीलर असोसिएशनने दिलेल्या निवेदनानुसार, जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बी-१०० बायो डिझेलच्या नावाखाली अवैधरीत्या भेसळयुक्त इंधनाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हे इंधन भारतीय मानक ब्युरो, तसेच भारत सरकारच्या मापदंडावर खरे उतरत नाही, असे सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात कापशी, चिखलगाव, आलेगाव, वाडेगाव, चान्नी, बाभूळगाव, माझोड, घूसर, गोनापूर, गुडधी आदी ठिकाणी अनेक विक्री केंद्र उभारण्यात आले असून, प्रशासनाची कोणतेही परवानगी घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अशा केंद्रावर कारवाई करून केंद्र सील करण्याची मागणी करण्यात आली आहे.