मूर्तिजापूर: तालुक्यात गुरुवार दि. १८ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी जि.प. सदस्य अप्पू तिडके यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अप्पू तिडके यांनी दिलेल्या निवेदनानूसार, तालुक्यातील लाखपुरी सर्कलमध्ये गुरुवार, दि.१८ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली होती. परिसरातील गहु, मका, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वादळ वाऱ्यामुळे अनेकांचे घरांचे नुकसान झाले आहे. या भागात त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, अशी मागणी अप्पू तिडके यांनी निवेदनातून केली.