मूर्तिजापूर : तालुक्यात अनेक भागांत शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करूनही बियाणे उगवलेच नसल्याने अस्मानी संकटासह महाबीजच्या बोगस बियाण्यांच्या संकटाला सामोरे जावे लागले. यासंदर्भात आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना ७ जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर २३ जून रोजी तालुका समितीने तपासणी केली. दरम्यान, महाबीजचे सोयाबीन बियाणे सदोष असल्याने उगवले नाही, असा पंचनामा करून तसा अहवाल शेतकऱ्यांना दिला आहे. तरीही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
त्या वेळीच राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कारवाई तत्काळ करावी, अशा सूचना दिल्या होत्या. यावर अवर सचिव महाराष्ट्र शासन उमेश चांदिवडे यांनी २३ जून रोजी एका पत्राद्वारे यासंदर्भात महाबीजला कळविले आहे. तत्काळ बियाणे बदलून देण्यात यावे, असेही पत्रात म्हटले होते. तरीही अनेक शेतकऱ्यांना बियाणे बदलून मिळाले नाही तर काहींना पेरणीचा कालावधी निघून गेल्यावर बियाणे उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन पेरली गेली नसल्याने त्यांच्यावर प्रचंड आर्थिक ताण आला आहे.
समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, सचिव सुरेश तिजारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. भारत फरकाडे, तालुका कृषी अधिकारी सुहास बेंडे व महाबीजचे क्षेत्रीय अधिकारी प्रमोद गावंडे यांनी तपासणी करून बियाणे सदोष असल्याने उगवले नसल्याचा अहवाल दिला होता. या बदल्यात आम्हाला आर्थिक मदत मिळावी, या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना गुरुवारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. आठ दिवसांत भरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरविंद तायडे, युवाध्यक्ष पंकज वानखडे, तालुका उपाध्यक्ष अ. परवेज अ. मलीक, अब्दुल मलीक म. याकूब यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------
तक्रारींची तालुका समितीने घेतली दखल
बियाणे बोगस निघाल्याने कौलखेड जहाँगीर, अनभोरा, धानोरा वैद्य, कुरुम, हेंडज, किनखेड, पिंळशेडा, राजुरा घाटे व जामठी यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेले महाबीजचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी व तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सचिव सुरेश तिजारे पंचायत समिती मूर्तिजापूर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. याची तत्काळ दखल घेऊन तालुका समितीने प्रत्यक्ष पाहणी केली होती.