जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मेपर्यंत काढलेल्या आदेशामध्ये घरपोच दूध विक्री व्यतिरिक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी होती. या जाचक अटीविरुद्ध १० मे रोजी अकोला जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष झाकीर उल्लाखा पटेल व ह.भ.प. वासुदेवराव महल्ले महाराज यांच्यासह जिल्ह्यातील दूध व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. दूध विक्री व वितरणाला प्रतिबंध करण्यात आला तर दूध संकलनावर प्रभाव पडेल. यामध्ये दूध उत्पादक भरडला जाईल, परिणामी शासनाच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हित जोपासण्याच्या धोरणाला तडा जाईल, असे त्यांना सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक आदेश देण्याचे आश्वासन दिले. या वेळी अकोला जिल्हा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष मोहन देशमुख, मूर्तिजापूरचे प्रशांत हजारी, रोहित राजेंद्र पुंडकर, संघाचे व्यवस्थापक गोविंदराव आगे, संघाचे संचालक अन्सार खान जुबेर अली हजर होते.
दूध विक्री व वितरणाला सूट देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:19 AM