रंभापूर : अकोट तालुक्यातील रंभापूरफाटा ते रंभापूर या मार्गावर असलेल्या बोर्डी नदीच्या पुलावर कठडे नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलाला कठडे बसविण्याची मागणी होत आहे.
रंभापूरफाटा-रंभापूर या मार्गावरील बोर्डी नदीवर पूल बांधण्यात आला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने पणज, वडाळी देशमुख परिसरातील शहापूर वाघोडा बृहत् प्रकल्प शंभर टक्के भरला असून, ओसंडून वाहत आहे. त्यामुळे बोर्डी नदीला पाणी वाहते असते. गावातील मुले शाळेत जाताना याच पुलावरून प्रवास करतात. नदीला पाणी असल्याने विद्यार्थी हे डोकावून खाली बघतात. पुलाला कठडे नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन पुलाला कठडे बसविण्याची मागणी होत आहे. तसेच बाहेरगावाहून बरेच भाविक झोटिंग महाराजांच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच गर्दी असते.
-----------सध्या या रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरू आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन पुलाला कठडे बसविण्यात यावेत.
- अविनाश गीते, सावरा रंभापूर
-----------------
शेतमजुरीचा व्यवसाय असल्याने सकाळीच शेतावर कामासाठी जावे लागते. अशा वेळी मुले घरून शाळेत जाताना लक्ष राहत नाही. कठड्याअभावी अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे लक्ष देऊन पुलाला कठडे बसविण्यात यावे. - गोपाल कात्रे, पालक