अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका महिलेच्या व्हॉट्स अॅप अकाउंटवरील छायाचित्र डाउनलोड करून, त्या छायाचित्रावरून महिलेचे अश्लील छायाचित्र तयार करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाºया युवकाविरुद्ध डाबकी रोड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.डाबकी रोडवरील रहिवासी एका महिलेने तिच्या व्हॉट्स अॅप अकाउंटवर स्वत:चा फोटो ठेवला होता. एका युवकाने या महिलेचा मोबाइल क्रमांक घेऊन महिलेने ठेवलेला फोटो स्वत:कडे सेव्ह करून घेतला. त्यानंतर महिलेला फोन करून तिच्या छायाचित्राचा गैरवापर करून तिचे अश्लील छायाचित्र तयार करणार असल्याचे सांगितले. महिला घाबरली असता त्याने १० हजार रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला महिलेने पैसे दिले, मात्र, काही दिवसांनी या युवकाने हा प्रताप पुन्हा सुरू केला. त्यामुळे महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता या प्रकरणाची डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी सदर मोबाइलधारक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू केला आहे.