अकोटः मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फे करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वंचित बहुजन महिला आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार, दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्रप्रकल्प क्षेत्र संचालक रेड्डी यांनी आरोपी शिवकुमार विरोधात केलेल्या तक्रारीवर कुठलीही कार्यवाही केली नाही. महिला अधिकाऱ्याचा छळ आणि आत्महत्या या प्रकरणात रेड्डी नावाचे अधिकारी सुध्दा दोषी असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन्ही अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन इतर दोषी अधिकाऱ्यांना आरोपी करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडी तालुका अकोट यांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देताना वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्षा सुनीता हिरोळे, पंचायत समिती सभापती लता नितोने, शहर अध्यक्ष मंगला वानखडे, कोकिला इंगळे, जयश्री तेलगोटे, मीरा तायडे, माया हिवराळे, मंगलाताई तेलगोटे, वैशाली राऊत, शत्रुध्न नितोने, मो.जमील उर्फ जमुपटेल, निलेश झाडे, प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती.(फोटो)