चोहोट्टाबाजार : कोरोना संक्रमण काळात छुप्या वाढीव दरामुळे सध्या वीज बिलांच्या रकमा वाढलेल्या आहेत. यास वाढीव दराचे परिपत्रक रद्द करून जुन्या वीज दराप्रमाणे ग्राहकांना वीज बिले द्या, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
पाच दिवसांचा आठवडा; नागरिक त्रस्त
बार्शीटाकळी : पाच दिवसांच्या आठवड्याने शासकीय कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. यापासून वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याने गावांचा अपेक्षित विकास होण्यास अडचणी आहेत.
वीट उत्पादक अडचणीत!
चोहोट्टा : वीट उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या राखेचे दर गत काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वीट उत्पादकांवर संकट कोसळले असल्याने शासनाने राखेचे भाव नियंत्रित करावे, अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून होत आहे.
रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या!
वाडेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, तसेच चौकालगत भाजी, फळ, तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज आहे.
कोरोनामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा फटका!
मूर्तिजापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.
बंदी असतानाही गुटख्याची विक्री!
अकोट : बंदी असतानाही तालुक्यातील अनेक भागांत गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण!
हाता : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे या संधीचा लाभ घेत खासगी वाहनचालकांनी भाडेवाढ केली आहे.
आठवडी बाजार बंद; शेतकरी संकटात
बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
‘माकडांपासून होणारा त्रास थांबवा!’
खानापूर : परिसरात माकडांनी गत काही दिवसांपासून धुडगूस घातला आहे. माकडे शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. माकडांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
इंधन दरवाढी: यांत्रिक मशागत महागली!
वाडेगाव : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे.
स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ
मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूल बसही बंद असून, स्कूल बस मालक व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने स्कूल बस सुरू करण्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी स्कूल बस चालकांकडून होत आहे.
‘रोहयो’ अंतर्गत कामे उपलब्ध करण्याची मागणी
बार्शीटाकळी: तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रब्बी हंगाम संपत आल्याने नागरिकांच्या हाताला काम नसल्याचे चित्र आहे.
तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नाही. मजूर कामाच्या शोधात महानगरात जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.
मास्क वापराकडे दुर्लक्ष; धोका वाढला!
मूर्तिजापूर : तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या त्रिसूत्रीचे नागरिकांकडून पालन होत नसल्याचे चित्र आहे. मास्क वापराकडेही दुर्लक्ष होत धोका वाढला आहे.
बाळापूर तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक
बाळापूर : तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. तसेच रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान
बोरगाव मंजू : म्हातोडी, घूसर, दोनवाडा, घुसरवाडी शिवारात वन्य प्राणी पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहींचा कळप पिकामध्ये मुक्त संचार करीत असल्याने पिकांचे नुकसान हाेत आहे.