पातूर : तालुक्यातील चिंचखेड, बोडखा गट ग्रामपंचायत येथील ग्राम चिंचखेड येथे वॉर्ड क्र.१ मधील रस्ता दलित वस्तीत मंजूर होता. परंतु हा रस्ता दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आला. तसेच रस्त्याचे काम अर्धवट सोडले असल्याचा आरोप करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चिंचखेड गावातील रस्त्याचे काम अर्धवट असल्याने घरांमध्ये पावसाचे पाणी, सांडपाणी शिरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित चौकशी करून कारवाईची मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संघटक आकाश हिवराळे, पातूर तालुका अध्यक्ष सागर इंगळे यांनी गटविकास अधिकारी अनंता लव्हाळे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी सागर सय्यद, राज बोरकर, अजय लोखंडे, किरण वानखडे, किसना कंटाळे, रवी वानखडे, बळीराम लोखंडे, दीपक मिराशय, राजेश मिराशय, अभिजित किरतकार, संतोष सुरवाडे आदी उपस्थित होते.