पातूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यास मनाई केली आहे. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांसह मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी करीत पातूर येथील व्यापाऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार यांच्याशी चर्चा केली.
शहरातील २५ व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार दीपक बाजड यांच्याशी चर्चा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. व्यापाऱ्यांनी कर्ज काढून छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले; मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटात दुकाने बंदच आहेत. त्यामुळे दुकानाचे भाडे देणे दुरापास्त झाले आहे. तसेच यापुढे दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करून किमान दोन तास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी आतिक हुसेन, मतिन कमाल, नईम शेख, बाबू मोबाईल, वाजिद शेख, आमीर सोहेल, सज्जाद खान, अब्दुल रहमान आदींंसह व्यापारी सहभागी होते. (फोटो)