वाडेगाव ग्रामपंचायतीची मतदार संख्या मोठी असल्याने भाग ४ व भाग ५ मधील मतदारांची मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या हेतूने तसेच मतदारांच्या सोईच्या दृष्टीकोनातून भाग क्र. ४ सिद्धार्थनगर येथील मतदारांना गावच्या या टोकावरून गावच्या दुसऱ्या टोकावर म्हणजे पोळा चौक येथील जि. प. कन्या शाळा येथे मतदान करायला जावे लागते. त्याच केंद्रावर इतर भागातीलसुद्धा मतदारांची गर्दी होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी सिद्धार्थनगरातील समाजमंदिर येथे नवीन मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच भाग क्र. ५ मधील इंदिरानगर येथील मतदारांना निर्गुणा नदीवरील बंधारा अडविल्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ६ कि.मि. अंतराचा प्रवास करत गावातील जि.प. उर्दू शाळा येथे यावे लागते. येथील मतदारांची ३०० ते ५०० संख्या असून या भागात एक जि.प. शाळा व एक समाजमंदिर असल्याने या दोन ठिकाणी दोन मतदान केंद्र उपलब्ध करून दिल्यास गर्दी तर कमी होईलच आणि मतदारांना ६ किमी अंतराच्या प्रवासाचा त्रास वाचेल. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर सोनटक्के, संजय तायडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजवर्धन डोंगरे, सागर पाटील सरप व सचेंद्र तिडके यांच्यासह नागरिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मतदारांच्या सोईनुसार मतदान केंद्र देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 4:33 AM