गेल्या वर्षभरात खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. दुष्काळ परिस्थिती त्यात कोविड संक्रमण, याचे बाजार पेठेवर झालेले परिणाम, त्यात शेतमालाचे बाजारात पडलेले भाव या सर्व परिस्थितीचा विचार न करता केंद्र सरकारने रासायनिक खतांचे भाव वाढविले आहेत. त्याचा उत्पादन खर्च वाढवून शेतमालाच्या किमती कमी करून उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी घटविले आहे.
अशा या परिस्थितीचा सामना करीत असतांना शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे, त्यात कोविड संक्रमणाच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समित्याही वेळेनुसार उघड्या नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर बेभाव परिस्थिती नुसार विकावा लागल्याचे निवेदनात म्हटले. रासायनिक खतांची केलेली भाववाढ ही शेतकऱ्यांसाठी जीवघेणी असून, ती त्वरित कमी करण्यात यावी अन्यथा, शेतकरी जागर मंचच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, दीपक गावंडे, ज्ञानेश्वर माळी यांच्या स्वाक्षर्या आहे.