जिल्हा परिषद शाळेची तपासणी
पारस : जिल्हा परिषद सदस्य आम्रपाली खंडारे यांनी पारस येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची शुक्रवारी पाहणी केली. यावेळी ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाचा आढावा घेतला. यावेळी शिक्षक नसीम अहमद सगीर, शेख इनायततुल्ला मुजीब उपस्थित होते.
आमदारांकडून जवंजाळ कुटुंबाचे सांत्वन
सावरा : अकोट तालुक्यातील सावरा येथील भाजपचे तालुका उपाध्यक्ष विजय जवंजाळ यांचे नुकतेच निधन झाले. आमदार रणधीर सावरकर यांनी शुक्रवारी सावरा येथे जाऊन जवंजाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी तेजराव थोरात, विजय अग्रवाल, राजेश नागमते, अरुण जवंजाळ, संतोष नागे उपस्थित होते.
रंगपंचमी साधेपणाने साजरी करा
आगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थतीत नियमांचे पालन करा व होळी, रंगपंचमीचा सण साधेपणाने साजरा करा, असे आवाहन उरळचे ठाणेदार अनंत वडतकार यांनी केले आहे.
मूर्तिजापूर एसटी आगारात कोरोना चाचणी
मूर्तिजापूर : येथील एसटी आगारामध्ये गुरुवारी कोरोना तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात ७१ कर्मचारी, अधिकाऱ्यांची तपासणी करून स्वॅब घेण्यात आले. तपासणीचा अहवाल तीन ते चार दिवसांमध्ये येणार आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाकडून शिबिरे घेण्यात येत आहेत.
पाणीपट्टी भरण्याचे ग्रामस्थांना आवाहन
आगर : खांबोरा पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचे बिल थकीत असल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थांनी थकीत पाणी कर तातडीने जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन अभियंता चव्हाण यांनी केले आहे.
दधम येथे आरओ वॉटर टँकचे उद्घाटन
बाळापूर : दधम येथील जि.प. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी जि.प. सदस्य वर्षा गजानन वझिरे यांच्या पुढाकारातून शाळेत आरओ वॉटर टँकचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच कुसुम जाधव, गजानन डाखुरे, पवन अग्रवाल, गोपाल वाकोडे, मंगेश पांडे उपस्थित होते.
गुड मॉर्निंग पथक कागदावरच
पिंजर : हागणदारीमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्यात आली. परंतु हे पथक केवळ कागदावरच दिसत आहे. पिंजर परिसरात लोक उघड्यावर शौच करतात. परंतु त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. यामुळे रोगराई पसरत आहेत.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे ट्रक उलटला
कुरणखेड : राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा फाटाजवळ खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात सीजी ४-एलडी ७३५८ क्रमांकाचा ट्रक उलटल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. माँ चंडिका आपत्कालीन पथकाचे रणजित घोगरे यांनी चालक व क्लीनरला ट्रकबाहेर काढले.
चुकीच्या पद्धतीने ई-निविदा काढल्याचा आरोप
बोरगावमंजू : ग्रामपंचायतने शासन नियमांना डावलून चुकीच्या पद्धतीने ई-निविदा काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्यात तक्रारीतून केला आहे. निविदेची मुदत १३ मार्च होती. मुदत संपल्यानंतरही २१ मार्चला निविदा उघडण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
बाळापुरात ४५ जण पॉझिटिव्ह
बाळापूर : बाळापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रॅपिड व आरटीपीसीआर कोरोना चाचणीमध्ये गत २० दिवसांमध्ये १,९९७ जणांची चाचणी करण्यात आली. यात ४५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. २२८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
विवाहितेचा छळ, पतीविरुद्ध गुन्हा
बाळापूर : विवाहितेचा लैंगिक छळ करणारा पती शेख बिसमिल्ला शेख हैदर (५९) याच्याविरुद्ध बाळापूर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. शेख बिसमिल्ला हा सातत्याने, अनैसर्गिक लैंगिक शोषण करीत असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांकडे केली.
माकडांचा धुडगूस, ग्रामस्थ त्रस्त
वाडेगाव : वाडेगाव येथे माकडांनी उच्छाद मांडला असून, पाण्याच्या शोधात माकडे गावात येत आहेत. घरांवर उड्या मारून कवेलू फोडत आहेत. छतांचे नुकसान करीत आहेत. माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
हिवरखेड : लॉकडाऊनमुळे दुकाने ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. परंतु व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी गुरुवारी हिवरखेड येथील व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे ठाणेदारांकडे केली आहे. ४५ गावे हिवरखेडशी जोडलेली आहेत. व्यवसाय वाढीसाठी प्रशासनाने दुकानांची वेळ वाढवून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.