अकोला: गेल्या फेब्रुवारी व मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील आकोट व मूर्तिजापूर या दोन तालुक्यातील गारपीटग्रस्त ३ हजार ५५१ शेतकर्यांच्या मदतीसाठी ८ कोटी ४२ लाख ४४ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे; मात्र मागणीच्या तुलनेत केवळ ३ कोटी ४९ लाख ७४ हजारांचा मदतनिधी २६ मे रोजी शासनामार्फत मिळाला आहे. त्यामुळे गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी आणखी ४ कोटी ९२ लाख ७0 हजार रुपयांचा मदतनिधी प्राप्त होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीच्या स्थितीत आधीच निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असताना, गेल्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील हरभरा, गहू, तूर पिकांसह फळपिके व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील आकोट व मूर्तिजापूर या दोन तालुक्यातील ३ हजार ५५१ शेतकर्यांचे ५ हजार ७९ हेक्टर ५ आर क्षेत्रावरील पिकांचे ५0 टक्क्याच्यावर नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. तसेच दोन्ही तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी ८ कोटी ४२ लाख ४४ हजार ३00 रुपयांचा मदतनिधी आवश्यक असल्याची मागणीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे करण्यात आली होती. मागणीच्या तुलनेत दोन्ही तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी केवळ ३ कोटी ४९ लाख ७४ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत २६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यामुळे गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी आणखी ४ कोटी ९२ लाख ७0 हजार ३00 रुपयांचा मदतनिधी शासनाकडून केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.
मागणी साडेआठ कोटींची; मिळाले साडेतीन कोटी
By admin | Published: June 08, 2015 1:37 AM