खानापूर : गावात ठिकठिकाणी कचरा पडला आहे. त्यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पातूर-बाळापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी
पातूर : पातूर-बाळापूर मार्गावरील बाभूळगाव बसस्थानकाजवळ गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने जात असल्याने अपघाताची शक्यता आहे. यापूर्वी किरकोळ अपघात घडले आहेत.
भारनियमनामुळे सिंचनास अडचण; शेतकरी संकटात
चिखलगाव : परिसरात मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे. तसेच दिवसा वीजपुरवठा बंद राहत असून, रात्रीच्या सुमारास काही वेळासाठी सुरू असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जागरण करावे लागते. रात्रीच्या सुमारासही भारनियमन होत असल्याने पिकांना सिंचन करणे शक्य होत नाही.
शेतात राबताहेत लहान मुले !
खिरपुरी : परिसरात सध्या कापूस वेचणी तसेच रब्बी हंगामातील पेरणी सुरू आहे. यामध्ये लहान मुलांकडून काम करून घेण्यात येत आहे. शाळेत पाठविण्याऐवजी मुलांना शेतात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
स्वच्छतागृहांची साफसफाई करावी
अकोट : शहरात असलेल्या शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. मुलींची कुचंबणा होत आहे. त्यामुळे शाळेतील स्वच्छतागृहांची साफसफाई करण्याची मागणी प्रल्हाद दुतोंडे यांनी केली आहे.
सोयाबीनच्या भावात वाढ!
वाडेगाव : वातावरणातील ओलावा कमी झाल्याने डागाळलेल्या सोयाबीनची आर्द्रता कमी झाल्याने भावात वाढ झाली आहे. अनेक शेतकरी उन्हात सोयाबीन सुकविण्यास टाकत आहे. आगामी काळात सोयाबीनच्या दरात वाढ होऊ शकते, अशी शक्यता आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
उरळ: गत काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट आली असल्यामुळे अनेकजण विनामास्क फिरत आहेत. गावातील दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
पाेलीसपाटील भत्त्याच्या प्रतीक्षेत
आपातापा : काेराेनाच्या काळात ग्राउण्ड लेव्हलवर काम करणाऱ्या पाेलीसपाटलांना प्राेत्साहन भत्ता देण्याची मागणी हाेत आहे. काेराेनायाेद्ध्यांना शासनाच्या वतीने प्राेत्साहन भत्ता देण्यात येत आहे. पाेलीसपाटलांनीही गाव पातळीवर काेराेना राेखण्याचे काम केले आहे.
‘त्या’ रुग्णांचीही होणार तपासणी
अकोला : कोरोनामुळे कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील टीबी व एचआयव्ही रुग्णांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
भाविकांची गर्दी
दहीहांडा : परिसरात गत काही दिवसांपासून मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे. मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आल्यानंतर अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत.