अकोटः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली; मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी करीत प्रहार जनशक्तीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, अकोट विभागीय नियंत्रकांना निवेदन दिले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद आहे की, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे बससेवा बंद करण्यात होती. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेत बससेवा सुरू करण्यात आली; मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू झाली नाही. नववी ते बारावीपर्यंत विद्यालये सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील बससेवा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. खासगी वाहनधारक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनातून केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना विशाल भगत, अचल बेलसरे, बजरंग मिसळे, विजय लिल्हारे, विशाल निचळ, जीनेश फुरसुले, रितेश हाडोळे, तुषार गये, अतुल दाफे, ऋषि लिल्हारे, अनिकेत फुरसुले, तुषार वाघमारे, लावण्य मिसळे आदी उपस्थित होते. (फोटो)