मूर्तिजापूर : येथील बाजार समितीच्या आवारात भरत असलेला गुरांचा बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आला आहे. तेव्हापासून अद्यापही बाजार बंदच असल्याने पशुपालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात गुरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पालकमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, बाजार समितीचे सभापती, सचिवांना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, येथील बाजार समितीच्या आवारात भरत असलेल्या गुरांचा आठवडी बाजार हा अनेक दिवसांपासून बंद आहे. शहर, ग्रामीण व बाहेरगावाहून गुरे या बाजारात विक्रीसाठी आणली जातात. शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना बैलांची गरज असते, मात्र आठवडी बाजार बंद असल्याने नाहक त्रास होत आहे. तसेच शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी गुरांचा बाजार सुरू करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष शुभम मोहोड, प्रतीक नागरीकर, निखिल ठाकरे, संदीप घाटे, संकेत मोहोड, ईलाइस खा, जमीर खा आदींसह पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती शहर संघटक प्रदीप पाटील यांनी दिली.
-------
व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ
गुरांचा आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अकोला जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व व्यापार सुरू केले आहेत. अशातच शेतकऱ्यांशी निगडित असलेला गुरांचा आठवडी बाजारसुद्धा सुरू करण्याची मागणी होत आहे.