बार्शिटाकळी: शहरातील मंगरूळपीर-अकोला या राज्य महामार्गाला लागून पूर्वेस पूरग्रस्त वसाहतीच्या रस्त्यावर अवैध बांधकाम सुरू असून, बांधकाम त्वरित थांबविण्याची मागणी महसूल कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, बार्शीटाकळी येथे गृहनिर्माण संस्थेचा सर्व्हे नंबर ३०२/३ आहे. सर्व्हे नंबर ३०१/२ व ३०२/३ हा शासनाने पूरग्रस्त वसाहतीसाठी संपादित केला असून, त्यामध्ये पूरग्रस्त धारकांना प्लॉट वितरित केले असून, त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. प्लॉटचा नकाशा सहायक संचालक नगररचना अकोला या कार्यालयाने मंजूर केला असून, त्यामध्ये मंगरुळपीर-अकोला या राज्य महामार्गाला लागून पूर्वेस पूरग्रस्त वसाहतीचा रस्ता आहे. या रस्त्यावर अंदाजे दहा हजार स्क्वेअर फूट जागेवर अवैध बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाचे खरेदी-विक्री व्यवहार हे बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेने निवेदनातून केला आहे. सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम होत असताना नगरपंचायत व महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पूरग्रस्त वसाहतीच्या पूर्वेस आणि पंचायत समितीच्या पश्चिमेस मंजूर नकाशामधील रस्त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल प्रशासनाने घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी लक्ष्मण अग्रवाल, शेखर काटेकर, रमेश काकड, केशव राऊत, अमोल तिडके, अशोक देशमुख, हनुमंतराव देशमुख, पांडुरंग पाटील, धनंजय चव्हाण, दिनकर धुरंधर, किशोर काळपांडे, गॅसोद्दीन शेख ,भास्कर थोरात, सुखदेव तायडे, वामनराव कांबळे, खुशालराव देशमुख आदींनी केली आहे.
----------------------
पूरग्रस्त वसाहतमधील शासनाच्या घरकुल योजनेचे ४७ लाभार्थी असून, या प्रकरणातील तक्रारीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाला मोजणी करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. मोजणीचे प्रक्रियेनंतर येणाऱ्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
-स्नेहल रहाटे, मुख्याधिकारी, नगर पंचायत बार्शीटाकळी.