अकोट : जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध कामांसाठी केलेल्या नियुक्त्या निदर्शनास आणून देऊन सर्व जिल्हा परिषदेमधील तसेच इतरही शिक्षकांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून प्राधान्य देत त्वरित लसीकरण करावे, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेने शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अकोट तालुक्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री बच्चू कडू आले असताना ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या आढावा बैठकीच्या वेळी प्रहार शिक्षक संघटनेने निवेदन दिले. शिक्षक संघटनेेने दिलेल्या निवेदनानुसार, शहरी भागात खासगी तथा नगरपरिषदेचे शिक्षक तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे शिक्षक कोरोना संक्रमित रुग्णांच्या घरी जाऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम करीत आहेत. अकोट पंचायत समितीमधील २५च्यावर शिक्षक आतापर्यंत कोरोना संक्रमित झालेले असून, त्यातील काही शिक्षक बरे होऊन घरी परतले आहेत, तर काही शिक्षकांवर उपचार सुरू आहेत. तसेच पथकातील ड्युटी केल्यानंतर बरेच शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. गतवर्षी अकोट पंचायत समितीमध्ये एका शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच जिल्ह्यातील जवळपास दोनशेवर शिक्षक कोरोना संक्रमित झाले असून, आतापर्यंत पाच शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पुढील महिन्यात पुढील महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने शाळेमध्ये पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहून त्यामुळे संक्रमणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांचे फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना यावेळी मंगेश टिकार जिल्हाध्यक्ष, अमर भागवत, जिल्हा कार्याध्यक्ष, हेमंतकुमार बोरोकार, जिल्हा संपर्कप्रमुख, राधेश्याम मंडवे, जिल्हा सचिव, अमित फेंडर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रमोद कोकाटे, तालुका प्रमुख आदी उपस्थित होते. (फोटो)